|| श्रीमहाराज ||

श्रीमहाराजांचे अल्पचरित्र

श्रीमहाराजांचे अल्पचरित्र

श्रीगजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया)चे भारतीय गुरू होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात (माघ वद्य सप्तमी)२३ तारखेला दिसले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन उत्सव म्हणून साजरा करतात. श्री देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाई-गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.

“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले.श्री गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे, त्यांनी भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचता येते हा संदेश दिला आहे.

सुमारे ३२ वर्षे श्री गजानन महाराजांनी भक्तजनांना शेगांव येथून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया श्री गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते.
महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर, हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत, म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.

श्री गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे ‘गण गण गणात बोते!’ हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.

मंत्राचा अर्थ लक्षात घेतला, तर कळेल. गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतः देखील वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही.

श्री गजानन महाराजांच्या मंत्रानुसार ‘गण गण गणात बोते’ अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे.

दि. ०८ सष्टेबर १९१० रोजी ऋषीपंचमी या तिथीस श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्त झाले. श्री गजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले . श्री गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी ‘ श्रीगजानन विजय’ ग्रंथामध्ये लिहिले आहे.


।।जय गजानन।।